Home पिंपरी चिंचवड ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : पिंपरी-चिंचवडकर नोंदवणार नवा विश्वविक्रम..!

ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा : पिंपरी-चिंचवडकर नोंदवणार नवा विश्वविक्रम..!

- मोशीत ४ ऑक्टोबरला हजारो ढोल-ताशांचा निनाद - स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ आणि धर्मध्वजाला ऐतिहासिक मानवंदनेचा संकल्प - १११ शंखांचा शंखनाद, शिवशंभो गर्जना, शाहिरी आणि मर्दानी खेळांचा थरार; सर्वांसाठी मोफत प्रवेश

by vastavchakranews2025@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी :

महाराष्ट्रभरातील ढोल-ताशा पथकांच्या साथीने पिंपरी-चिंचवडकर नव्या विश्वविक्रमाचा संकल्प साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. हजारो ढोल-ताशांचा गगनभेदी निनाद, १११ शंखांचा सामूहिक शंखनाद, शिवभक्तीपर गीतांचा जागर आणि मर्दानी खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिके अशा सादरीकरणांनी मोशी येथे ऐतिहासिक मानवंदना सोहळा रंगणार आहे. यासाठी पाच हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला आणि उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या ‘धर्मध्वज’ला मानवंदना देण्यासाठी रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात कार्यक्रम होणार असून, सर्व नागरिकांसाठी प्रवेश मोफत आहे.

हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात शौर्य, सांस्कृतिक परंपरा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळणार आहे.

गतवर्षीच्या मानवंदनेची प्रेरणा; नव्या विक्रमाची तयारी
गतवर्षी ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला ढोल-ताशांच्या विश्वविक्रमी निनादातून मानवंदना देण्यात आली होती. त्या सोहळ्याची प्रेरणा घेऊन यंदा अधिकाधिक पथकांना एकत्र आणण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्राच्या रणवाद्य परंपरेचा वारसा जपणारी पथके राज्यभरातून पिंपरी-चिंचवडमध्ये दाखल होणार आहेत. विविध पथकांच्या सामूहिक वादनातून नवा विश्वविक्रम नोंदविण्याचा आयोजकांचा संकल्प असून, विक्रमाची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर होईल.पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात येत असलेला १२८ मीटर उंच धर्मध्वज जगातील सर्वांत उंच भगवा ध्वज ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. या निर्माणाधीन धर्मध्वजाच्या गौरवार्थही हजारो वादक मानवंदना देणार आहेत.

१११ शंखांचा निनाद; ‘शिवशंभो गर्जना’चा जागर
सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद हे विशेष आकर्षण असेल. त्यासोबत शिव-शंभूंच्या विचारांचा जागर करणारा ‘शिवशंभो गर्जना’ हा शिवभक्तीपर सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहे. ढोल-ताशांचा ठेका आणि शिवभक्तीपर गीतांच्या सुरांतून शिव-शंभूंच्या पराक्रमाला वंदन करण्यात येणार आहे.

शाहीर माने, खुपिरे यांचे सादरीकरण; मर्दानी खेळांचा थरार
शाहीर चंद्रकांत माने यांचे ‘स्वराज्याचं तोरण बांधील’ विशेष सादरीकरण आणि शाहीर खुपिरे यांच्या शाहिरी कार्यक्रमाचा सोहळ्यात समावेश आहे. शाहिरीच्या बुलंद ललकारीतून शिव-शंभूंच्या शौर्यगाथांचा जागर होणार आहे. तसेच पारंपरिक युद्धकलेचा वारसा उलगडणाऱ्या मर्दानी खेळांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांतून उपस्थितांना शौर्य आणि कौशल्याचा थरार अनुभवता येणार आहे.

नशामुक्त भारतासाठी प्रतिज्ञा; संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’ गायन
सांस्कृतिक सादरीकरणांसोबत व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेशही दिला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच कुटुंब आणि समाजाला जागरूक करण्याचा संकल्प उपस्थित करतील. संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’च्या सामूहिक गायनातून मातृभूमीला स्वरांची मानवंदना अर्पण करण्यात येणार आहे.

‘इतिहास घडतोय… साक्षीदार व्हा!’
शिव-शंभूप्रेमी, सांस्कृतिक चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिकांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘इतिहास घडतोय… साक्षीदार व्हा!’ अशी साद घालत या ऐतिहासिक मानवंदनेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया :
“गतवर्षीच्या ऐतिहासिक मानवंदनेचा अनुभव आजही पथकांच्या मनात ताजा आहे. यंदा पाच हजारांहून अधिक वादक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी सज्ज आहेत. सर्व पथकांच्या एकत्रित वादनातून घुमणारा निनाद हा सोहळ्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण असेल.”
— पराग ठाकूर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, ढोल-ताशा महासंघ

प्रतिक्रिया :
“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या गौरवशाली स्मृतींना वंदन करण्यासाठी आणि निर्माणाधीन धर्मध्वजाला ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे. १२८ मीटर उंच उभारण्यात येत असलेल्या भगव्या ध्वजाला हजारो ढोलवादकांच्या सामूहिक वादनातून विश्वविक्रमी मानवंदना देण्याचा आमचा संकल्प आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही शिव-शंभूप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
— गणेश महाराज भुजबळ, उपाध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट.

CONTACT: VASTAV CHAKRA NEWS — 9373118087

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00