Home पिंपरी चिंचवड शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद… पिंपरी-चिंचवडचा गिनीज विश्वविक्रम!

शिव-शंभू विचारांचा गगनभेदी निनाद… पिंपरी-चिंचवडचा गिनीज विश्वविक्रम!

- ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा ऐतिहासिक मानवंदना - मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली तीन ठिकाणी एकाचवेळी वादन - हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ सोहळा

by vastavchakranews2025@gmail.com
0 comments

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी :

पाच हजाराहून अधिक ढोलांचा एकसंध ठेका, सलग पाच मिनिटांचे शिस्तबद्ध सामूहिक वादन आणि शिव-शंभूंच्या जयघोषाने पिंपरी-चिंचवडमध्ये रविवारी ऐतिहासिक क्षण साकारला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला विश्वविक्रमी ढोल-ताशा मानवंदना सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या सोहळ्यात एकाच वेळी सर्वाधिक ढोल वाजविण्याचा विश्वविक्रम नोंदविण्यात आला. या कामगिरीची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड आणि ढोल-ताशा महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात महाराष्ट्रभरातील पथकांनी सहभाग घेतला. मोशी, स्पाईन रोड आणि वाघेश्वर मंदिर, चऱ्होली अशा तीन ठिकाणी ढोल-ताशांचे वादन करण्यात आले. यापूर्वी 2 हजार 650 ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम होता. पिंपरी-चिंचवडमध्ये आता 4 हजार 112 ढोल-ताशा वादनाचा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आले.

सोहळ्याची सुरुवात स्वागत आणि प्रास्ताविकाने झाली. त्यानंतर शिवशंभो गर्जना सादर झाली, गो सन्मान आवाहन अभियान राबवण्यात आले आणि मर्दानी खेळांनी उपस्थितांची मने जिंकली. गिनीज रेकॉर्डच्या तयारीसाठी ढोल-ताशा पथकांची मांडणी करण्यात आली, त्यानंतर पुन्हा शिवशंभो गर्जना झाली. शंखनादानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ढोल-ताशांच्या गजरात मानवंदना देण्यात आली.

यानंतर मर्दानी खेळ, शाहीर चंद्रकांत माने यांचे शाहिरी सादरीकरण, विशेष कविता सादरीकरण आणि शिवशंभूगर्जना सादर झाली. शाहीर खुपिरे यांनी आपल्या खास शैलीत सादरीकरण केले, तसेच ढोल-ताशा महासंघाच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. उपस्थितांनी नशामुक्त भारताची सामुदायिक प्रतिज्ञा घेतली. आमदार महेश लांडगे यांनी संबोधन करून संपूर्ण “वंदे मातरम्” गायनाचे आवाहन केले. त्यानंतर गिनीज रेकॉर्डबाबत माहिती देण्यात आली आणि सामूहिक ढोल-ताशा सेलिब्रेशन झाले. शाहीर खुपिरे यांनी धनगर ओव्या सादर केल्या. समारोपात उपस्थितांचे आभार मानण्यात आले आणि पुढील वर्षी रविवार, १९ सप्टेंबर २०२७ रोजी याच ठिकाणी हा कार्यक्रम नव्या उत्साहात आयोजित करण्याचा संकल्प करण्यात आला.

तीन संधी; पाच मिनिटांच्या शिस्तबद्ध वादनातून विक्रम

विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी वादकांना तीन संधी उपलब्ध होत्या. एकाच वेळी सर्वाधिक ढोलांचे सलग पाच मिनिटे शिस्तबद्ध वादन करणे हे या प्रयत्नाचे प्रमुख उद्दिष्ट होते. सामूहिक वादनातील एकसंधपणा, ठेक्यातील सातत्य आणि समन्वय राखत पथकांनी विश्वविक्रमाचा संकल्प पूर्णत्वास नेला. विविध पथकांतील हजारो वादकांनी एकत्र येत महाराष्ट्राच्या रणवाद्य परंपरेची ताकद दाखवून दिली. ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला मानवंदना अर्पण करण्यात आली. भारतमाता ची मनमोहक रंगावली रेखाटण्यात आली होती.

शिव-शंभूंचा जयघोष; राष्ट्रभक्तीचा जागर

‘हर हर महादेव’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्‌’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा ठेका आणि उपस्थितांचा जयघोष यांतून शिव-शंभूंच्या पराक्रमाला वंदन करण्यात आले. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात शौर्य, सांस्कृतिक परंपरा, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा संगम अनुभवायला मिळाला. गतवर्षीच्या मानवंदनेची प्रेरणा घेऊन यंदा अधिक व्यापक सहभागातून विश्वविक्रम साकारल्याचे आयोजकांनी नमूद केले.

१११ शंखांचा निनाद, निर्माणाधीन धर्मध्वजालाही मानवंदना

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’सोबत उभारण्यात येत असलेल्या १२८ मीटर उंच भगव्या धर्मध्वजाच्या गौरवार्थही मानवंदना देण्यात आली. शिव-शंभूंच्या गौरवशाली स्मृतींना अभिवादन आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक वाद्यांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. सोहळ्यात १११ शंखांचा सामूहिक शंखनाद विशेष आकर्षण ठरला. ‘शिवशंभो गर्जना’ या शिवभक्तीपर सांगीतिक कार्यक्रमातून शिव-शंभूंच्या विचारांचा आणि पराक्रमाचा जागर करण्यात आला.

गोमाता सन्मान अभियानाची जागृती; नशामुक्तीची प्रतिज्ञा

सोहळ्याच्या निमित्ताने ‘गोमाता सन्मान अभियान’विषयी जनजागृती करण्यात आली. सांस्कृतिक सादरीकरणांसोबत सामाजिक बांधिलकीचा संदेश देत ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत सामूहिक प्रतिज्ञाही घेण्यात आली. स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच कुटुंब आणि समाजात जागृती करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. संपूर्ण ‘वंदे मातरम्‌’च्या सामूहिक गायनातून मातृभूमीला स्वरांची मानवंदना अर्पण करण्यात आली. हजारो वादकांची शिस्त, पथकांचा समन्वय आणि शिव-शंभूप्रेमींच्या सहभागातून साकारलेला हा विश्वविक्रम पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरला.

प्रतिक्रिया :

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ला हजारो ढोल-ताशांच्या निनादातून अर्पण केलेली ही मानवंदना म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्य, संस्कृती आणि एकजुटीचा अभिमानास्पद आविष्कार आहे. वादकांची शिस्त, पथकांचा समन्वय आणि शिव-शंभूप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विश्वविक्रमाचा संकल्प साकार झाला. या यशाचे खरे मानकरी सर्व वादक, पथकप्रमुख, स्वयंसेवक, सहकारी आणि संस्कृती प्रेमी नागरिक आहेत. शिव-शंभूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच व्यसनमुक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक समाज घडविण्यासाठी आपण एकत्र काम करूया!”

– महेश लांडगे, आमदार तथा अध्यक्ष, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट.

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00